जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्रियाताई शिंदे यांना फलटणच्या लोकप्रतिनिधींकडून शुभेच्छा
फलटण: सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मा. सौ. प्रियाताई महेश शिंदे यांची भेट घेऊन त्यांना विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी फलटण तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या दोन प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये फलटण पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले आणि सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या ॲड. सौ. किरणताई निलेश नलवडे, जिल्हापरिषद सदस्या ऋतुजा अभिजित जगताप यांचा समावेश होता. या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फलटण तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. एकाच व्यासपीठावर जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या महिला नेतृत्वाने एकत्र येत शुभेच्छांचा वर्षाव केल्याने राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सौ. प्रियाताई शिंदे यांच्या भावी वाटचालीस उत्तमोत्तम यश लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.