फलटण शहरात सार्वजनिक मुतारींची दुर्गंधी; फलक वेगळा : नगरपालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष, नागरिक हैराण
फलटण (प्रतिनिधी):फलटण शहराचा विस्तार वेगाने होत असताना नागरी सुविधांचा मात्र पुरता बोजवारा उडाला आहे. शहरातील मुख्य चौक आणि बाजारपेठेच्या भागातील सार्वजनिक मुतारींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे पादचारी आणि व्यापाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, "नगरपालिका प्रशासन ठोस कारवाई करणार की केवळ दुर्गंधीचा वास घेत बसणार?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
परिस्थितीचे भयावह वास्तव
शहरातील बस स्थानक परिसर, गजबजलेले बाजारपेठ सह गडसोली मैदान समोर रामराजे शॉपिंग सेंटर समोर मुख्य रस्त्यांवरील मुतारींची नियमित स्वच्छता होत नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी पाणी उपलब्ध नाही, तर काही ठिकाणी सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था कोलमडली आहे. परिणामी, या भागातून जाताना नागरिकांना नाकाला रुमाल लावून जावे लागत आहे.
व्यापाऱ्यांचे आणि नागरिकांचे हाल
मुतारीच्या शेजारी असलेल्या व्यावसायिकांना या दुर्गंधीचा मोठा फटका बसत आहे. ग्राहकांना दुकानात उभे राहणे कठीण झाले आहे. "स्वच्छ फलटण सुंदर फलटण "च्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवले जात असून, प्रत्यक्षात जमिनीवर स्वच्छतेचा पत्ताच नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.
प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
पावसाळा जवळ येत असताना जर ही दुर्गंधी अशीच राहिली, तर शहरात साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. मुख्याधिकारी आणि स्वच्छता विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुतारींची दुरुस्ती आणि दररोज स्वच्छता करण्याची मागणी जोर धरत आहे.
"शहरात ठिकठिकाणी मुताचा वास येत असून नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. नगरपालिकेने लवकरात लवकर स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
Comments
Post a Comment