फलटण तालुक्यातील वीटभट्ट्यांवरील 'माती आणि कोळशा'च्या गौण खनिजाची चौकशी करा
तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा नागरिकांचा आरोप जिल्हा गौण खनिज अधिकारी लक्ष देणार ?
फलटण:
फलटण तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून वीटभट्ट्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, या व्यवसायासाठी लागणारी माती आणि वापरला जाणारा कोळसा यांबाबत मोठे गैरप्रकार होत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. "परवाना १०० ब्रासचा आणि उत्खनन १००० ब्रासचे" असा धक्कादायक प्रकार सुरू असून, याकडे तहसील प्रशासनाचे किती लक्ष आहे, असा सवाल आता सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अनेक वीटभट्टी चालक शासनाकडून ठराविक कमी मर्यादेपर्यंत माती काढण्याचा परवाना घेतात. परंतु, प्रत्यक्षात जमिनीतून त्यापेक्षा दहापट अधिक माती उपसली जात आहे. या अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून शासनाचा लाखो रुपयांचा रॉयल्टी महसूल बुडत आहे.
अवैध कोळशाचा प्रश्न ऐरणीवर
मातीसोबतच वीटभट्ट्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कोळशाबाबतही संशयास्पद स्थिती आहे. हा कोळसा नेमका कुठून येतो? तो वैध मार्गाने खरेदी केला जातो का? आणि या कोळशाच्या साठवणुकीसाठी आवश्यक परवानगी आहे का? याचीही कसून चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तहसीलदार यांनी तालुक्यातील सर्व वीटभट्ट्यांची प्रत्यक्ष आणि स्वतंत्र पाहणी करावी. दिलेल्या परवान्यानुसार किती माती वापरली गेली आणि सध्या भट्ट्यांवर किती साठा उपलब्ध आहे, याचा तातडीने खुलासा व्हावा. परवान्यापेक्षा जास्त माती आढळल्यास संबंधित वीटभट्टी मालकांवर गुन्हे दाखल करून भट्ट्या सील करण्यात याव्यात. अवैध स्वरूपात कोळसा साठवणूक करणाऱ्यांची पाळेमुळे खोदून काढावीत.
फलटणच्या तहसीलदारांनी या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन अनधिकृत गौण खनिज उत्खननाला लगाम लावावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.जिल्हा गौण खनिज अधिकारी लक्ष देणार का आणि
प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment