दहिवडी भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार रामभरोसे; अधिकारी मिळेनात आणि सामान्यांचे हाल थांबेनात!
दहिवडी माण:तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या दहिवडी येथील 'भूमी अभिलेख कार्यालय' सध्या दप्तरदिरंगाई आणि भ्रष्टाचाराच्या चर्चेमुळे वादाच्या भोवर्यात असल्याच्या चर्चा सुरू आहे. कार्यालयात अपुऱ्या अधिकारी वर्गाचे कारण पुढे करत सर्वसामान्य नागरिकांना नाहक हेलपाटे मारायला लावले जात असून, "पैसे दिल्याशिवाय काम होत नाही" अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अनेक नागरिक सातबारा, मोजणी किंवा जमिनीच्या इतर कामांसाठी मैलोन्मैल प्रवास करून कार्यालयात येतात. मात्र, "साहेब सीटवर नाहीत" किंवा "अधिकारी रजेवर आहेत" अशी उत्तरे देऊन त्यांना माघारी धाडले जाते. हातावरचे पोट असलेल्या सामान्य शेतकऱ्याला आपले हक्काचे काम करण्यासाठी दिवसाचा रोजगार बुडवून कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. कार्यालयातील दिरंगाईमागे केवळ मनुष्यबळाचा अभाव आहे की जाणीवपूर्वक केलेली अडवणूक, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, एजंटमार्फत किंवा 'काही' देवाणघेवाण केल्यास रखडलेल्या फाईल्स तत्काळ हलतात. "स्वत...