ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक योगेश खरात यांना' 'डीजी इन्सिग्निया' पदक जाहीर
फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा!
ठाणे (प्रतिनिधी):
सोमवार पेठ, फलटण येथील रहिवासी आणि ठाणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश बापुराव खरात यांना महाराष्ट्र पोलीस दलातील अत्यंत मानाचे समजले जाणारे 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' (DG Insignia) जाहीर झाले आहे. आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा छडा लावून कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आणल्याबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला असून, त्यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर फलटणचे नाव गाजले आहे.
७० लाखांच्या 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणाचा यशस्वी तपास
सप्टेंबर २०२५ मध्ये मुंबईतील की. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्ध व्यक्तीला 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून ७० लाख रुपयांना लुटण्यात आले होते. आरोपींनी चक्क एटीएस दिल्ली आणि एनआयएचे वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते असल्याचे भासवून, फिर्यादीचा दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याचे सांगत त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे स्थानबद्ध केले होते.
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून योगेश खरात आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान खालील महत्त्वाच्या बाबी समोर आल्या:
आंतरराज्यीय धाडस: गुजरात आणि राजस्थानमध्ये सलग १४ दिवस अहोरात्र सापळा रचून ६ मुख्य आरोपींना अटक केली.
क्रिप्टो कनेक्शन: लुटलेली रक्कम 'क्रिप्टोकरन्सी'द्वारे अमेरिकन डॉलरमध्ये रूपांतरित करणाऱ्या एका मुख्य सूत्रधारालाही बेड्या ठोकल्या.
मोठे रॅकेट उघड: या टोळीचा तपास केला असता, महाराष्ट्र सायबर विभागाकडे प्रलंबित असलेल्या तब्बल ५८ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यातही या आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
महासंचालकांकडून गौरव
अत्यंत क्लिष्ट आणि तांत्रिक कौशल्य लागणाऱ्या या गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल, पोलीस महासंचालकांनी योगेश खरात यांची प्रवर्ग २' (दरोडेखोर व संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्धची कारवाई)अंतर्गत या सन्मानासाठी निवड केली.
"फलटणच्या मातीतील एका सुपुत्राने सायबर गुन्हेगारीच्या जागतिक जाळ्याला छेद देत केलेली ही कामगिरी तरुण पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशामुळे सोमवार पेठ सह फलटण मंगळवार पेठ सह तालुक्यात परिसरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे."
Comments
Post a Comment