दहिवडी भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार रामभरोसे; अधिकारी मिळेनात आणि सामान्यांचे हाल थांबेनात!

दहिवडी माण:तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या दहिवडी येथील 'भूमी अभिलेख कार्यालय' सध्या दप्तरदिरंगाई आणि भ्रष्टाचाराच्या चर्चेमुळे वादाच्या भोवर‍्यात असल्याच्या चर्चा सुरू आहे.
 कार्यालयात अपुऱ्या अधिकारी वर्गाचे कारण पुढे करत सर्वसामान्य नागरिकांना नाहक हेलपाटे मारायला लावले जात असून, "पैसे दिल्याशिवाय काम होत नाही" अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

अनेक नागरिक सातबारा, मोजणी किंवा जमिनीच्या इतर कामांसाठी मैलोन्मैल प्रवास करून कार्यालयात येतात. मात्र, "साहेब सीटवर नाहीत" किंवा "अधिकारी रजेवर आहेत" अशी उत्तरे देऊन त्यांना माघारी धाडले जाते. हातावरचे पोट असलेल्या सामान्य शेतकऱ्याला आपले हक्काचे काम करण्यासाठी दिवसाचा रोजगार बुडवून कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

कार्यालयातील दिरंगाईमागे केवळ मनुष्यबळाचा अभाव आहे की जाणीवपूर्वक केलेली अडवणूक, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, एजंटमार्फत किंवा 'काही' देवाणघेवाण केल्यास रखडलेल्या फाईल्स तत्काळ हलतात. "स्वतःचे पैसे खर्च करून आणि वेळ वाया घालवूनही काम होत नसेल, तर प्रशासनाचा वचक राहिला आहे का?" असा सवाल विचारला जात आहे.

भूमी अभिलेख कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी या गोंधळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का? असा संशय आता बळावू लागला आहे. कार्यालयातील भ्रष्टाचाराची ही साखळी कधी तुटणार आणि सर्वसामान्यांची कामे वेळेवर कधी होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

"आम्ही किती दिवस हेलपाटे मारायचे? प्रशासकीय दिरंगाईमुळे होणारा मानसिक आणि आर्थिक त्रास थांबणार का? पैशांची उघड मागणी करणाऱ्यांवर कारवाई होणार का?"

आता या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर दखल घेऊन दहिवडी भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार सुधारणार की 'तारीख पे तारीख'चे सत्र सुरूच राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर संतप्त नागरिक आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय