सरडे गावात मृत जनावरांच्या दुर्गंधीने नागरिक हैराण; प्रशासन सुस्त, आंदोलनाचा इशारा
सरडे (प्रतिनिधी): येथील मुख्य चौकातील वनविभागाच्या जागेत मृत जनावरे उघड्यावर टाकली जात असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या गंभीर प्रश्नाकडे वनविभाग, महसूल आणि आरोग्य प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास 'जनआंदोलन' छेडण्याचा इशारा स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. अस्वच्छतेचे साम्राज्य मिळालेल्या माहितीनुसार, गावातील मुख्य चौकात असलेल्या वनविभागाच्या मोकळ्या जागेचा वापर मृत जनावरे टाकण्यासाठी केला जात आहे. ही जनावरे नेमकी कोण आणि कुठून आणून टाकते, याचा शोध घेण्याऐवजी वनविभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. भरवस्तीत पसरलेल्या या दुर्गंधीमुळे लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गावातील समस्या सोडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच अधिकारी गावात फिरकत नसल्याचे चित्र आहे. गावाचे तलाठी मुख्यालयी नसल्याने त्यांना या प्रकाराची कल्पनाच नाही. गावच्या कामकाजासाठी नेमलेला संबंधित कर्मचारी नेमका कुठे असतो, ...