बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन! 'मुरूम पास' केवळ २० ब्रासचा, प्रत्यक्षात मात्र कित्येक ब्रास मुरूमाची विल्हेवाट; महसूल विभागाचे डोळे झाक?

संबंधित सर्कल तलाठी चौकशी होणे महत्वाचे ..?

सांगवी (प्रतिनिधी):
तालुक्यात महसूल विभागाच्या नाकाखाली बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीचा गोरखधंदा जोरात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ २० ब्रास मुरूम नेण्याची अधिकृत परवानगी (मुरूम पास) दाखवून चक्क हजारो ब्रास मुरूमाची बेकायदेशीर उचल करण्यात आली असल्याचे नागरिक बोलत आहेत. नियमांची जाहीर पायमल्ली करणाऱ्या या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून, हा मुरूम नेमका कोठून उत्खनन केला आणि कुठे टाकला? याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, सांगवी परिसरातील एका ठराविक ठिकाणाहून मुरूम काढण्यासाठी प्रशासनाकडून कायदेशीररीत्या फक्त २० ब्रासची मंजुरी घेण्यात आली होती. मात्र, या अधिकृत पासचा गैरवापर करून, प्रशासकीय डोळेझाकपणाचा फायदा घेत संबंधित घटकांनी हजारो ब्रास मुरूम तिथून गायब केला. दिवस-रात्र डंपर आणि ट्रॅक्टरच्या फेऱ्या मारून परिसरातील निसर्गाचे लचके तोडण्यात आले आहेत.

 ज्या जागेवरून हा हजारो ब्रास मुरूम काढण्यात आला, तिथे उत्खननाची खोली किती आहे आणि ती नियमात आहे का?
मुरूम कोठे टाकला? – शासकीय की खाजगी कामासाठी हा मुरूम वापरण्यात आला? हजारो ब्रास मुरूमाची विल्हेवाट नेमकी कुठे लावली गेली, याचा शोध घेणे गरजेचे आहे.

 २० ब्रासच्या पासवर हजारो ब्रासची वाहतूक होताना स्थानिक महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याची साधी कुणकुणही लागली नाही का, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी शासनाने कडक नियम केले आहेत. मात्र, फलटण परिसरामध्ये या नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र आहे. केवळ २० ब्रासचा कागदी घोडा नाचवून हजारो ब्रासची लूट सुरू असताना महसूल विभागाचे 'अर्थपूर्ण' शांतता पाळली आहे का? असा रोकडा सवाल नागरिक विचारत आहेत.
...तर उग्र आंदोलन छेडणार!
या मोठ्या मुरूम घोटाळ्याची तात्काळ जागेवर जाऊन पाहणी (स्पॉट पंचनामा) करण्यात यावी. उत्खनन झालेल्या जागे मोजमाप करून अनधिकृत उपशाचा शोध घ्यावा आणि दोषींवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी. अन्यथा, या भ्रष्ट कारभाराविरोधात आणि प्रशासकीय दिरंगाईविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक जागरूक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
"हा केवळ महसूल बुडवण्याचा प्रकार नसून पर्यावरणाची मोठी हानी आहे. २० ब्रासच्या मंजुरी आड हजारो ब्रास मुरूम वाहून नेणाऱ्यांची आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची कुंडली 'सातारा सम्राट' लवकरच उघड करणार!"

Comments

Popular posts from this blog

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते