सरडे गाव दोन दिवसांपासून अंधारात; महावितरणच्या कारभारावर संताप, संतप्त तरुणांचा 'अर्धनग्न' आंदोलनाचा इशारा
कोकण ट्रिप करणारे लाईट साठी एकत्र येतील काय ..? की अंधार करण्याची सवय झाली ..?
सरडे (प्रतिनिधी):
फलटण तालुक्यातील सरडे गाव गेल्या दोन दिवसांपासून अंधारात असून, महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील वीज पुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, राजकीय लोकांच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी आता थेट 'अर्धनग्न मोर्चा' काढण्याचा आणि प्रसंगी नवीन राजकीय पर्याय निवडण्याचा पवित्रा घेतला आहे.
राजकीय अनास्थेचा फटका
मिळालेल्या माहितीनुसार, सरडे गावात गेल्या ४८ तासांपासून वीज गायब आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र, या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि महावितरणचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. "महावितरणच्या अधिकाऱ्यांना हटवा आणि गावाला अंधारातून वाचवा," अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
'कोकण ट्रिप' वरून नागरिकांची सडकून टीका
एकिकडे गाव अंधारात असताना दुसरीकडे ग्रामपंचायत सदस्य मात्र काहीच दिवस पूर्वी कोकण सहलीत दंग असल्याची चर्चा गावात रंगली आहे. "निवडणुकीच्या वेळी कोण कोणाकडे पक्ष बदल असणारे सदस्य आता वीज गेल्यावर 'हा आमचा वॉर्ड नाही' असे सांगून जबाबदारी झटकत आहेत," अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. कोकण सहलीवर होणाऱ्या खर्चावरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, "सहली मध्ये जसे एकत्र होता तसे एकत्र येऊन गावात वीज सुरू करा," असा टोला नागरिकांनी सरपंच आणि सदस्यांना लगावला आहे.
प्रस्थापित राजकारण्यांच्या उदासीनतेमुळे त्रस्त झालेल्या सरडे गावातील तरुणांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. गावातील मूलभूत समस्या सुटत नसल्याने तरुणांनी स्वतःचा नवीन राजकीय पक्ष काढण्याचे संकेत दिले आहेत. जर तातडीने वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर सरडे ग्रामपंचायतीवर 'अर्धनग्न मोर्चा' काढला जाईल, असा इशारा तरुणांनी दिला आहे.
आता महावितरणचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment