फलटण तालुक्यात छुप्या पद्धतीने माती उत्खनन जोरात; गौण खनिज विभागाचे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष?
फलटण (प्रतिनिधी):
फलटण तालुक्यात सध्या विविध ठिकाणी मातीचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, या उत्खननाबाबत महसूल विभाग आणि गौण खनिज विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे हे उत्खनन रीतसर परवानगी घेऊन सुरू आहे की अधिकाऱ्यांच्या 'वरदहस्ताने' छुप्या पद्धतीने सुरू आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तालुक्यातील अनेक भागांतून ट्रॅक्टरच्या सहाय्याने मातीची अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. या संदर्भात काही सजग नागरिकांनी गौण खनिज अधिकारी माने मॅडम यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलताना त्यांनी, "सध्या तालुक्यात कुठेही माती उपशाचे पास (परवानगी) दिलेले नाहीत," असे स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांच्या या विधानामुळे संभ्रम वाढला आहे. जर प्रशासनाने कोणतेही पास दिलेले नाहीत, तर दिवसाढवळ्या राजरोसपणे मातीचे उत्खनन आणि वाहतूक कशी काय सुरू आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. हे उत्खनन नेमके कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे आणि याकडे तहसील कार्यालयातील गौण खनिज विभाग डोळेझाक का करत आहे, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
लवकरच 'दुध का दुध अन् पाणी का पाणी' होणार?
तालुक्यात कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळेत माती उत्खनन झाले आहे आणि कोणत्या ट्रॅक्टरद्वारे ही माती कुठे नेली जात आहे, याची सविस्तर माहिती आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. संबंधित विभागाचे अधिकारी या अवैध व्यवसायावर कारवाई करणार की याकडे दुर्लक्ष करून अनधिकृत गौण खनिज उपशाला प्रोत्साहन देणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Post a Comment