ॲड. वर्षा देशपांडे आणि प्रा. नागेश दप्तरदार यांना 'संघर्ष गौरव पुरस्कार' प्रदान
देवगड: सोलापूर इतिहास संशोधन मंडळाच्या १९ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे औचित्य साधून सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ॲड. वर्षा देशपांडे आणि प्रा. नागेश दप्तरदार यांना प्रथम 'संघर्ष गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. हे अधिवेशन देवगड येथील श्री स.ह. केळकर कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात उत्साहात पार पडले.
दोन्ही मान्यवरांना रोख ५,००० रुपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि सोलापूरी नॅपकिनचा गुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विकास मंडळ देवगडचे सभापती एकनाथ तेली होते. यावेळी व्यासपीठावर सोलापूर इतिहास संशोधन मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य सोपानराव जावळे, डॉ. अमिता जावळे, मंडळाचे सध्याचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय गायकवाड, प्राचार्य डॉ. विजयकुमार कुणुरे, समन्वयक प्रा. श्रीकांत सिरसाठे आणि उपाध्यक्ष डॉ. शिवाजी वाघमोडे उपस्थित होते.
ॲड. वर्षा देशपांडे: (कै. कलावती संभाजी जावळे संघर्ष गौरव पुरस्कार)
१९८८ पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ॲड. देशपांडे यांनी स्त्री जन्माच्या स्वागतासाठी आणि गर्भलिंग निदान विरोधात दिलेला लढा ऐतिहासिक आहे. बीडमधील गाजलेले डॉ. मुंडे प्रकरण त्यांनीच उघडकीस आणले होते. १०० पेक्षा जास्त बालविवाह रोखण्यासोबतच त्यांनी 'युनो'चा (UNO) प्रतिष्ठित 'यु.एन. पॉप्युलेशन अवॉर्ड २०२५' मिळवून देशाची मान जागतिक स्तरावर उंचावली आहे.
प्रा. नागेश दप्तरदार: (कालकथित अनुसया सदाशिव गायकवाड संघर्ष गौरव पुरस्कार)
सिंधुदुर्गचे 'मानद वन्यजीव रक्षक' म्हणून ओळखले जाणारे प्रा. दप्तरदार १९९४ पासून पर्यावरण संवर्धनासाठी झटत आहेत. नामशेष होणाऱ्या 'ऑलिव्ह रिडले' कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या कार्यावर आधारित 'कासव' या चित्रपटाला राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले असून 'गार्डियन्स ऑफ टर्टल' ही आंतरराष्ट्रीय लघुपट निर्मितीही झाली आहे.
"महिलांच्या हक्कासाठी दिलेला लढा आणि कायदेशीर मदत ही काळाची गरज आहे," असे मत ॲड. वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केले. तर, "निसर्ग आणि प्राण्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे," असे आवाहन प्रा. दप्तरदार यांनी आपल्या मनोगतातून केले.
मंडळाचे सचिव डॉ. विकास शिंदे यांनी केले. या सोहळ्याला इतिहास संशोधक, प्राध्यापक आणि देवगडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment