सातारा जिल्हा येथे नवीन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची नियुक्ती
राज्य गृहविभागाने पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या असून, सातारा जिल्हा येथे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून निखिल पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली सांगली येथे करण्यात आली आहे.
नवीन एसपी निखिल पिंगळे हे अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि संवेदनशील मुद्दे लक्षात घेता, त्यांच्या समोर अनेक महत्त्वाची आव्हाने असणार आहेत.
तसेच जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई, सातारा व कराड परिसरात शिफ्ट गाड्या (बेकायदेशीर प्रवासी वाहतूक) चालवण्यावर नियंत्रण, वैद्यकीय क्षेत्रातील अवैध दवाखान्यांवर कारवाई, तसेच गुन्हेगारी आणि नशाबंदीशी संबंधित प्रकरणांवर कडक अंमलबजावणी करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
जनतेवर होणाऱ्या अन्यायाच्या प्रकरणांची शहानिशा करून, नोंदवलेल्या केसेसची योग्य तपासणी केली जाईल का, तसेच आवश्यक असल्यास उच्च अधिकाऱ्यांकडे पाठवण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक केली जाईल का, याकडेही लक्ष लागले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांची पाहणी करून कामकाजात सुधारणा करण्यात येईल का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी, तसेच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागण्या समजून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवीन एसपी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कामकाजाची दिशा आणि प्राधान्यक्रम याबाबत चित्र स्पष्ट होईल.
Comments
Post a Comment