सांगवीत कायद्याचे धिंडवडे; १० रुपयांत मिळतंय 'मरण', पोलीस प्रशासन झोपले की झोपल्याचे सोंग घेतेय?

सांगवी (प्रतिनिधी): "साहेब, आमचं घर उध्वस्त होतंय, पोराबाळांच्या तोंडचा घास ही दारू हिरावून घेतेय... कुणीतरी वाचवा आम्हाला!" हा टाहो आहे सांगवी गावातील त्या माता-भगिनींचा, ज्यांच्या घराचा उंबरठा आज अवैध दारूमुळे काळवंडला आहे. गावात गल्लीबोळांत फुटलेल्या अवैध हातभट्ट्यांनी सांगवीचा श्वास गुदमरला असून, पोलीस प्रशासनाच्या 'आशीर्वादाने' हा मरणाचा व्यापार जोरात सुरू असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.

सांगवी गावात आज परिस्थिती इतकी भयानक झाली आहे की, चहापेक्षा स्वस्त दारू मिळू लागली आहे. अवघ्या १० रुपयांत दारूचा ग्लास हातात पडतोय. ही 'स्वस्त' दारू गरिबांच्या आयुष्याची राखरांगोळी करत आहे. गावातील पारावर, शाळेच्या कोपऱ्यात आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपींचा राबता वाढला असून, सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. तरुण पिढी या व्यसनाच्या विळख्यात अडकत असताना पोलीस मात्र सोयीस्कर डोळेझाक करत आहेत.

गावात कुठे हातभट्टी सुरू आहे, कुठे छुपी विक्री होतेय, हे गावातील लहान मुलालाही माहित आहे; मग खाकी वर्दीला याचा सुगावा का लागत नाही? हा प्रश्न आता संतापजनक ठरत आहे. पोलिसांच्या या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे "वरदहस्त नेमका कुणाचा?" अशी चर्चा आता जनमानसात रंगत आहे. कधीतरी 'नावाला' धाड टाकायची आणि पुन्हा दुसऱ्या दिवसापासून 'ये रे माझ्या मागल्या' हा प्रकार सुरूच राहतो.

"पोलीस केवळ कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानत आहेत. प्रत्यक्षात मात्र गाव दारूच्या विळख्यात अडकले आहे. ही अवैध दारू बंद झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू." अशा काही संतप्त महिला ग्रामस्थ, सांगवी. मध्ये चर्चा सुरू आहेत.

दारूमुळे गावात केवळ व्यसनाधीनता वाढली नाही, तर गुन्हेगारीनेही डोके वर काढले आहे. दारूच्या नशेत होणारे वाद, भांडणे आणि महिलांना गावात भीतीचे वातावरण आहे. संध्याकाळच्या वेळी महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलीस यांच्यात समन्वयाचा अभाव आहे का?

सांगवीकरांचा संयम आता सुटत चालला असून, जर या अवैध व्यवसायावर तात्काळ आणि कायमस्वरूपी बंदी घातली नाही, तर गावात मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता तरी प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन या 'मरणाच्या व्यापारा'ला लगाम घालणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?