महाड चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटींची तरतूद केल्याने शासनाचे आभारी आहोत..... वैभव गिते, राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस
महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९ व्या वर्धापन दिनानिमित्त २० मार्च २०२६ रोजी शासनस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, याच दिवशी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ५५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, वर्धापन दिन सोहळा व भूमिपूजन कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी यासंदर्भात आयोजित बैठकीत दिले.
बैठकीस रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनिल वारे, सहसचिव सोमनाथ बागुल, सहायक आयुक्त सुनिल जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, तहसीलदार महेश शितोळे यांच्यासह संबंधित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक सत्याग्रहास 100 वर्ष पूर्ण होत असल्याने महाड चवदार तळे सुशोभीकरण करण्यासाठी भरीव निधी मंजूर करून महाराष्ट्रात वर्षभर विविध कार्यक्रम राबवावेत अशी मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस एन.डी.एम.जे संघटनेच्या वतीने राज्य महासचिव डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनात शासनास व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी यांच्याकडे करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी बार्टीचे महासंचालक श्री सुनील वारे यांना महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये भेटून राज्य सचिव वैभव गिते, भाऊराव तायडे, संजय सोनवणे, गोविंद मोरे, आप्पा गायकवाड, जय माने व सहकार्यांनी निवेदन देऊन ही मागणी केली होती. महासंचालक श्री. सुनील वारे यांनी आपले निवेदन उचित कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्या निवेदनाची गंभीर दखल घेत सामाजिक न्याय मंत्री श्री संजय शिरसाट यांनी मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करून महाड चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटी भरीव निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्य सचिव वैभव गिते यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ ,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे,समाज कल्याणच्या आयुक्त दीपा मुधोळ मुंडे,निबंधक विशाल लोंढे,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड सुनील जाधव बार्टीचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांचे आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment