फलटण तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष; नियम धाब्यावर बसवून अनधिकृत धंदे तेजीत?
नियम धाब्यावर, हॉटेल सह इतर ठिकाणी हप्त्यांचा खेळ सुरू?
फलटण:
फलटण तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत अनधिकृत मद्यविक्री आणि अवैध धंदे जोमात सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून होत आहे. नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे डोळेझाक केल्यामुळे "काम कोणाचे आणि काम करते कोण?" असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून नियम आणि अटींचे पालन करणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी हे नियम कागदावरच राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहर असो वा ग्रामीण भाग, कागदोपत्री केवळ नावालाच नावांची यादी ठेवून प्रत्यक्षात मात्र हप्त्यांच्या जोरावर अवैध धंदे राजरोसपणे सुरू ठेवण्यात येत असल्याची चर्चा जोर धरत आहे. कारवाईच्या नावाखाली केवळ औपचारिकता पूर्ण केली जात असून, याप्रकरणी संबंधित यंत्रणेचे अधिकारी 'झोपेचे सोंग' घेत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फलटण तालुक्यातील या अनागोंदी कारभाराबाबत आणि बेकायदेशीर धंद्यांच्या वाढत्या सुळसुळाटाबाबत आता संतप्त नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पावले उचलण्याचे ठरवले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व चालकांवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी लवकरच राज्य उत्पादन शुल्क मंत्री महोदयांना अधिकृत निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आता या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होते आणि प्रशासनाला जाग येते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.
भाग १
हॉटेल मध्ये परवानगी नाही तेथे देशी आणि हातभट्टी मग घरघरात सुद्धा ..? आशिर्वाद कोणाचे
Comments
Post a Comment