कोळकी’मध्ये दिवाळीत पाण्यासाठी हाहाकार; ‘दिवाळी सण मध्ये, जनतेचे हाल..!
कोळकी (प्रतिनिधी):
एकीकडे संपूर्ण देशासह परिसरात प्रकाशाचा आणि समृद्धीचा महापर्व ‘दिवाळी’ मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. नागरिक घरे सजवण्यात, रोषणाई करण्यात आणि सणाचा आनंद लुटण्यात मग्न आहेत. मात्र, दुसरीकडे कोळकी येथील काही अपार्टमेंट'मधील रहिवाशांना याच सणाच्या दिवसांत हंडाभर पाण्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागत आहे. "सत्ताधारी मात्र स्वतः मजेत दिवाळी साजरी करत आहेत, त्यांना जनतेच्या दुःखाशी काहीही देणे-घेणे उरलेले नाही," असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहेत.
कोळकी येथील अपार्टमेंटमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत घराघरांत पाण्यासाठी महिला, बालके आणि ज्येष्ठांना वणवण करावी लागत आहे. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य असोत वा कर्मचारी, नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. तक्रार घेऊन गेल्यावर केवळ आश्वासने दिली जातात, परंतु प्रत्यक्ष कामात मात्र शून्य प्रगती दिसून येत आहे.
नागरिकांनी आपला संताप व्यक्त करताना सांगितले की, "घरपट्टी किंवा पाणीपट्टीची वेळ आली की ग्रामपंचायतीचे कर्मचारी लगेच दारात येऊन हजर होतात आणि वसुलीचा तगादा लावतात. कर भरण्यात थोडा जरी उशीर झाला तरी कारवाईचा धाक दाखवला जातो. मात्र, जेव्हा मूलभूत सोयी-सुविधा देण्याची वेळ येते, तेव्हा सर्वच जण हात वर करतात. कितीही तक्रारी केल्या तरी फिरत नाही."
स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतःच्या सण-उत्सवांमध्ये आणि मजेत व्यग्र असताना, सामान्य जनतेला मात्र मूलभूत गरजांसाठीही झुंजावे लागत आहे. जनतेच्या जीवाशी हा खेळ मांडणारे हे सत्ताधारी नेमके कोणाचे हित पाहत आहेत? आणि जर सणासुदीच्या दिवसांतही पाण्यासाठी अशीच वणवण राहाणार असेल, तर या कोळकीतील लोकांचे भवितव्य काय आणि त्यांच्या समस्या सोडवणार तरी कोण? असा संतप्त सवाल आता अवधूत अपार्टमेंटसह संपूर्ण कोळकी ग्रामस्थ विचारत आहेत.
Comments
Post a Comment