श्री. महादेव मोरे यांच्याकडून सरडे बंगला जि. प. शाळेला क्रीडा (स्पोर्ट किट) साहित्याची भेट
सरडे (विशेष बातमीदार):
फलटण तालुक्यातील सरडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सरडे बंगला या शाळेला सातत्याने मदतीचा हात देणारे दाते श्री. महादेव हणमंत मोरे यांनी नुकतेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे (स्पोर्ट किट) वाटप केले. त्यांच्या या औदार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना मोठा वाव मिळाला असून, मुलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून नसून खेळाचेही तितकेच महत्त्व आहे, ही भावना ओळखून श्री. महादेव हनुमंत मोरे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी यापूर्वीही सामाजिक बांधिलकी जपत शाळेच्या विविध उपक्रमांत भरीव मदत केली आहे. अशा दानशूर व्यक्तींमुळेच ग्रामीण भागातील शाळांचा कायापालट होण्यास मदत होत आहे.
शाळेचा विकास आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी अशा आणखी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. गावातील व परिसरातील दानशूर नागरिकांनी, माजी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी आपल्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात (उदा. शैक्षणिक साहित्य, संगणक, क्रीडा साहित्य, डिजिटल फलक इत्यादी) मदत करून या शैक्षणिक यज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.
शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मदत करणाऱ्या अशा प्रत्येक दानशूर व्यक्तीच्या सामाजिक कार्याची 'सातारा सम्राट' वृत्तपत्राच्या माध्यमातून मोफत (फ्री) जाहिरात व बातमी देऊन विशेष दखल घेतली जाईल आणि त्यांची प्रसिद्धी केली जाईल, अशी ग्वाही साप्ताहिक सातारा सम्राटच्या वतीने देण्यात आली आहे.
श्री. महादेव मोरे यांच्या या कौतुकास्पद सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि पालकांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment