गोखळी परिसरात मातीचे बेसुमार उत्खनन; निसर्गाचा समतोल धोक्यात.
तत्काळ कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा.
फलटण (प्रतिनिधी):
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर माती व मुरुमाचे बेसुमार उत्खनन सुरू असून, यामुळे नीरा नदीच्या पात्राला मोठा धोका निर्माण झाला आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्याने आणि जमिनीची सुपीकता नष्ट होत असल्याने तालुक्यात निर्माण होत असलेल्या दुष्काळी परिस्थितीमागे हे बेकायदेशीर माती उत्खननच मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने हे उत्खनन तत्काळ न थांबवल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील पूर्व भागातील गोखळी आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून माती उपशाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दररोज हजारो ब्रास माती बाहेरील तालुक्यात वाहतूक केली जात आहे. सततच्या उत्खननामुळे जमिनीची धूप होऊन सुपीकता कमालीची घटली असून स्थानिक पर्यावरणावर व हवामानावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. जलस्रोत आटत चालल्यामुळे आणि भूजल पातळी खालावल्यामुळे दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे.
गोखळी परिसरात होत असलेल्या या बेसुमार उत्खननाचा थेट फटका नीरा नदीच्या पात्राला बसत आहे. नदीपात्राची नैसर्गिक रचना बदलत असून भविष्यात मोठ्या पर्यावरणीय आपत्तीला सामोरे जावे लागण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी वर्ग या उत्खननामुळे कमालीचा त्रस्त झाला असून, महसूल प्रशासन व संबंधित अधिकारी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. जर हे माती उत्खनन तत्काळ रोखले नाही, तर संबंधित प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने व आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
Comments
Post a Comment