मंगळवेढा तालुक्यातील अनेक नागरिकांना घरकुलासाठी प्रत्येकी ५०० स्क्वेअर फूट गायरान जागा उपलब्ध; वैभव गिते, राज्य सचिव एन.डी.एम.जे
प्रांताधिकारी बी.आर.माळी, तहसीलदार मदन जाधव व गटविकास अधिकारी जस्मिन शेख यांचे आभारी आहोत... पंकज काटे जिल्हाध्यक्ष एन.डी.एम.जे
मंगळवेढा / प्रतिनिधी:
मंगळवेढा तालुक्यातील खडकी, बावची, नांदूर आणि शिरनांदगी या गावांमधील अनेक गरजू नागरिकांना घरकुले बांधण्यासाठी गायरान जमिनीतील प्रत्येकी ५०० स्क्वेअर फूट जागा मिळवून देण्यात यश आले आहे, अशी माहिती नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी दिली आहे.
तत्कालीन सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पासाठी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना शासकीय जमीन वाटप करण्यासाठीचे दिशा निर्देश यासाठी सुधारित परिपत्रक महसूल विभागाच्या वतीने काढण्यात आली होते.
यानुसार गाव निहाय जागा मागणीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत दिशानिर्देश देण्यात आले होते. संबंधित गटविकास अधिकारी,तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांचे कडे जागा मागणीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकारी यांनी दिले होते.
त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे व वैभवजी गिते यांनी माळशिरस तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरकुले बांधण्यासाठी सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना शासनाच्या जमिनीमधून 500 स्क्वेअर फुट जागा प्रत्यक्षात मिळवून दिली.
याच धर्तीवर मंगळवेढा तालुक्यामध्ये देखील अनेक घरकुल लाभार्थी असून देखील त्यांना घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा उपलब्ध करावी यासाठी पंकज काटे येताळा खरबडे ऍड.रोहित एकमल्ली यांनी आवाज उठवला.
घरकुले बांधण्यात व कागदपत्रांमध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत असे उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य येताळा खरबडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही बाब संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकज काटे व एडवोकेट रोहित एक मल्ली यांना सांगितली.
या सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी व उपविभागीय अधिकारी मंगळवेढा गटविकास अधिकारी मंगळवेढा यांच्याकडे पाठपुरावा करून मंगळवेढा तालुक्यातील पाच गावांमध्ये सर्व जाती धर्मांच्या नागरिकांना घरकुले बांधण्यासाठी गायरान मधील 500 स्क्वेअर फुट जागा प्रत्येक लाभार्थ्यास मंजूर झाली आहे. यासाठी गटविकास अधिकारी मंगळवेढा जास्मिन शेख, तहसीलदार मदन जाधव यांनी योग्य कागदपत्रांसह प्रस्ताव उपविभागीय अधिकारी श्री माळी यांच्याकडे सादर केला.
उपविभागीय अधिकारी श्री माळी यांनी गायरान विभागातील पाचशे स्क्वेअर फुट जागा जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशास अधीन राहून लाभार्थ्यांना जागा मंजूर केली आहे.
यामुळे एन. डी.एम.जे संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गिते व आंबेडकरी चळवळीचे नेते विकास धाईंजे यांनी मंगळवेढा प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
या महत्त्वपूर्ण कार्यासाठी संघटनेचे पदाधिकारी पंकज काटे, येताळा खरबडे आणि रोहीत एकमल्ली यांनी विशेष परिश्रम घेतले. या पदाधिकाऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच तालुक्यातील अनेक बेघर व गरजू कुटुंबांना स्वतःचे घरकुल उभारण्यासाठी जागा उपलब्ध झाली असून यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
"तालुक्यातील बेघर नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू असून आगामी काळातही गरिबांच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच राहील," असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment