सांगवी ग्रामपंचायत अधिकाऱ्याला योगेश काकडे व प्रतिक रणदिवेकडून खंडणी मागणी, तर ॲट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी..?
फलटण (प्रतिनिधी):
सांगवी (ता. फलटण, जि. सातारा) येथील ग्रामपंचायत अधिकारी श्री. भरत भानुदास भोसले यांनी गावातील योगेश संजय काकडे आणि प्रतिक बाळासो रणदिवे यांच्याविरोधात खंडणी मागणे, जिवे मारण्याची धमकी देणे आणि ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवल्याचे गंभीर आरोप एका पत्रा द्वारे केले आहेत. या सततच्या त्रासामुळे आणि दडपणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ग्रामपंचायत अधिकारी भरत भोसले यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार, ते गेल्या एका वर्षापासून सांगवी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आरोप केला आहे की, गावातील योगेश संजय काकडे व प्रतिक बाळासो रणदिवे हे दोघे त्यांना कामकाज करत असताना सतत नाहक त्रास देऊन कामात अडथळा निर्माण करत आहेत.
फोन न उचलल्यास दमदाटी करणे आणि जिवे मारण्याची धमकी देणे, असे प्रकार घडत असल्याचा दावा भोसले यांनी पत्रात केला आहे.
खंडणी आणि ॲट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिली गेली आहे.
अर्जात नमूद केल्याप्रमाणे, एप्रिल २०२६ मध्ये योगेश काकडे यांनी दमदाटी करून भोसले यांच्याकडून १३,५०० रुपयांची खंडणी वसूल केली. या घटनेचे ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामरोजगार सेवक हे साक्षीदार असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
यानंतर पुन्हा योगेश काकडे आणि प्रतिक रणदिवे यांनी त्यांच्याकडे १ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास "तुला जिवंत ठेवणार नाही आणि तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करू" अशी थेट धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या सर्व गंभीर धमक्या आणि त्रासामुळे अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या ग्रामपंचायत अधिकारी भरत भोसले यांना ०५/०८/२०२६ रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना फलटण येथील गॅलक्सी हॉस्पिटल (डॉ. बंडगर) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
०१/०९/२०२६ रोजी पुन्हा सांगवी ग्रामपंचायतीत हजर झाल्यानंतरही त्यांना त्रास व दमदाटी सुरूच असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे. योगेश काकडे व प्रतिक रणदिवे यांच्यापासून आपल्या जिवाला गंभीर धोका असल्याचे सांगत, आपल्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास हे दोघेच जबाबदार असतील, असे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेकडे आणि संबंधित प्रशासकीय वरिष्ठांकडे तक्रार सादर करण्यात आली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Comments
Post a Comment