राज्यातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडीत २९९ महिला शेतकरी प्रमाणपत्र अर्जांना मान्यता प्रमाणपत्र वितरण
या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयात दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जांची पात्रता व पडताळणी करण्यात आली. धुमाळवाडीतील २९९ महिलांनी अर्ज केले होते. पडताळणीनंतर सर्व २९९ अर्जांना मान्यता देण्यात आली.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी तथा कृषी सेवारत्न सचिन जाधव यांनी महिला शेतकरी प्रमाणपत्राची पात्रता, अर्ज प्रक्रिया तसेच प्रमाणपत्रामुळे मिळणाऱ्या सुविधांबाबत मार्गदर्शन केले. प्रमाणपत्रामुळे महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय कृषी योजना, कृषी कर्ज, पीक विमा, कृषी निविष्ठा तसेच कृषी विभागाच्या विविध सेवांचा लाभ घेणे सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी मोनिका मुळीक, कृषी सखी माधुरी हुंबे, ग्रामपंचायत सदस्य व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. ग्रामसभेस ग्रामस्थ व महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
Comments
Post a Comment