फलटण, लोणंद अन् साखरवाडी परिसरात अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने; अपघातांचा धोका वाढला, कडक कारवाईची मागणी
फलटण / लोणंद (प्रतिनिधी): नितीन जगताप
फलटण शहरासह लोणंद आणि साखरवाडी परिसरात सध्या अल्पवयीन मुलांच्या हाती सर्रास दुचाकी आणि चारचाकी वाहने पाहायला मिळत आहेत. वाहतुकीच्या नियमांची कोणतीही माहिती नसताना अन् परवाना नसताना ही मुले अतिवेगाने आणि बेदरकारपणे वाहने पळवत असल्याने इतर पादचारी व वाहनधारकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारांकडे वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) तातडीने लक्ष देऊन कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत.
सकाळी आणि संध्याकाळी शाळा, कॉलेज सुटण्याच्या वेळी तसेच ट्यूशन क्लासच्या परिसरात अल्पवयीन विद्यार्थ्यांचा भरधाव वेगाने गाड्या चालवण्याचा स्टंटबाजीचा थरार पाहायला मिळतो. ट्रिपल सीट प्रवास करणे, कानठळ्या बसवणारे सायलेन्सर वापरणे आणि गर्दीच्या ठिकाणी स्टंटबाजी करणे हे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. यामुळे फलटण, लोणंद आणि साखरवाडीच्या अंतर्गत रस्त्यांवर लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे.
अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने सोपवणाऱ्या पालकांची बेजबाबदार वृत्तीही या समस्येला कारणीभूत आहे. अपघातात एखाद्याचा नाहक बळी गेल्यावर किंवा गंभीर दुखापत झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
अल्पवयीन मुले गाडी चालवताना आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांच्या मालकांवर आणि संबंधित पालकांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसच्या वेळेत वाहतूक पोलिसांनी विशेष पथके तैनात करून वाहनांची तपासणी करावी.
दंडात्मक कारवाई व समुपदेशन: नियमभंग करणाऱ्या अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करून त्यांच्या पालकांना थेट पोलीस ठाण्यात पाचारण करून समज देण्यात यावी.
स्थानिक प्रशासनाने व वाहतूक विभागाने या गंभीर बाबीची वेळीच दखल घेऊन अल्पवयीन वाहनधारकांवर कडक मोहिमेद्वारे कारवाई करावी, अन्यथा याविरोधात तीव्र आवाज उठवला जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
Comments
Post a Comment