'शिवसेने' चे फलटण तालुकाप्रमुख नानसो इवरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे फलटण तालुक्यातील तलाव व धरणांतील गाळ काढण्याची केली मागणी
फलटण:तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळाचे सावट अधिकच गडद होत असून यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी तालुक्यातील धरणे, पाझर तलाव आणि फलटण तलावातील साचलेला गाळ काढून तो शेतकऱ्यांना विनामूल्य देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना फलटण तालुकाप्रमुख श्री. नानसो इवरे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील धरणे आणि तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने त्यांची पाणीसाठवण क्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे जलसाठे लवकरात लवकर कोरडे पडत असून पाणीटंचाईची समस्या तीव्र होत आहे. यावर उपाय म्हणून शासनाची 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' ही लोकोपयोगी योजना फलटण तालुक्यात तात्काळ लागू करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तलाव आणि धरणांतील साचलेला गाळ बाहेर काढल्यामुळे जलसाठ्यांची साठवण क्षमता वाढेल, ज्यामुळे दुष्काळी भागात पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यास मदत होईल.
तलावातील सुपीक गाळ शेतकऱ्यांच्या शेतात पसरवल्यास जमिनीची सुपीकता वाढून पिकांची आवक सुधारेल आणि उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल.
दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी ही योजना अत्यंत प्रभावी ठरणार असून तालुक्यातील सर्व सामान्य शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या विषयात विशेष लक्ष घालून संबंधित प्रशासकीय विभागांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी विनंती नानसो इवरे यांनी केली.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या मागणीची तत्परतेने दखल घेतली आहे. तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने या विषयावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि संबंधित विभागाला योग्य ते निर्देश व आदेश दिले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
Comments
Post a Comment