नाव मुंडे साहेबांचे... खिशा फुगवतायत भलतेच गुंडे!’ फलटण तालुक्यात छुप्या मार्गाने चालणाऱ्या अवैध धंद्यांचा भांडाफोड.
अमली पदार्थांचे दर दुप्पट, हप्तेबाजीतही मोठी वाढ!
फलटण (विशेष प्रतिनिधी):
प्रशासकीय शिस्त आणि कडक कारवाईसाठी ओळखले जाणारे धडक कारवाईचे अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नावाची सध्या फलटण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेच्या आडून तालुक्यातील अवैध धंदेवाले आणि काही भ्रष्ट साखळी यांनी कमाईचा नवा मार्ग शोधून काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंडे साहेबांच्या नावाचा धाक दाखवून अमली पदार्थ, गुटखा आणि इतर अवैध वस्तूंचे दर थेट दुप्पट-तिप्पट करण्यात आले असून हप्त्यांच्या रक्कमेतही मोठी वाढ झाली आहे.
गुटखा आणि अंमली पदार्थांचे भाव गगनाला
फलटण शहर व ग्रामीण भागात बंदी असलेला गुटखा आणि इतर अंमली पदार्थांची विक्री छुप्या मार्गाने जोरात सुरू आहे. एरवी १० रुपयांना मिळणाऱ्या गुटख्याच्या पुडीसाठी आता २० ते ३० रुपये मोजावे लागत आहेत. "पुढे कारवाईचा आणि साहेबांचा कडक पहारा आहे, माल मिळणे कठीण झाले आहे," असे सांगून व्यसनी लोकांची उघडपणे लूट सुरू आहे. बाजारात अमली पदार्थांच्या किमतीत तिपटीने वाढ झाली असली, तरी त्याचा पुरवठा मात्र कुठेही थांबलेला नाही.
‘हप्ते वाढले’चे कारण सांगून लूट
स्थानिक पातळीवर हप्तेखोरी करणाऱ्या यंत्रणेने आणि अवैध धंद्यातील माफियांनी तुकाराम मुंडे यांच्या नावाची भीती दाखवून हप्त्यांचे दर वाढवल्याची कुजबुज सुरू आहे. "वरपर्यंत सांभाळावे लागते" असे भासवून वसुलीचे प्रमाण वाढवले गेले आहे. प्रत्यक्षात कडक अधिकाऱ्याच्या नावाने दहशत निर्माण करायची आणि मागे स्वतःचे खिसे भरायचे, असा हा सरळसरळ खेळ सुरू आहे.
नाव मुंडे... खायला लागले वेगळेच गुंडे!
तुकाराम मुंडे यांच्यासारख्या धडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याच्या नावाचा गैरवापर करून फलटणमधील काही स्थानिक गुंड आणि अवैध व्यावसायिक आपले उखळ पांढरे करत आहेत. 'नाव मुंडे साहेबांचे आणि मलिदा लाटणारे भलतेच गुंडे', अशी संतप्त प्रतिक्रिया आता सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे.
प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची गरज
केवळ नावाचा वापर करून चाललेला हा काळाबाजार आणि अनधिकृत दरवाढ रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) काय कारवाई करणार? की या भ्रष्ट साखळीकडे दुर्लक्ष केले जाणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी होऊन बेकायदेशीर साठेबाजी व लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे
Comments
Post a Comment