श्रावण संपल्यावर खायला मजा आहे मटण' आणि 'चुणचुण्या'

श्रावण महिना संपायला सुरुवात झाली आहे . गल्लीबोळातून, चौकातून फक्त एकाच गोष्टीची चर्चा सुरू होती—कधी एकदा श्रावण संपतोय आणि कधी ताटात झणझणीत रस्सा येतोय!
एका गावात तिथेच शेजारी एक गृहस्थ मोठ्या उत्साहाने सर्वांना सांगत होते, "भाऊ, काहीही म्हणा... श्रावण संपल्यावर मटण खायला जी मजा आहे ना, ती कशातच नाही!"
तिथे उभ्या असलेल्या एका तरुणाने सहज विचारले, "काका, एवढं कौतुकाने सांगताय, मग मटण नक्की कसलं आवडतं तुम्हाला? बोकडाचं, शेळीचं, की अजून कसलं?"
ते गृहस्थ थोडे अडखळले, मान खाजवत म्हणाले, "अहो, ते कसले प्रकार मला काय माहीत! मटण म्हणजे मटण! ताटात आलं, की खायचं... आपल्याला फक्त मटणाशी मतलब!"
त्यांचे हे बोलणे ऐकून बाजूलाच बसलेले एक अनुभवी वृद्ध शेतकरी हसले आणि म्हणाले, "काका, तुमची गोष्ट तर अगदी त्या 'काजू' समजून 'चुणचुण्या' खाणाऱ्या माणसासारखी झाली!"
तरुणाने उत्सुकतेने विचारले, "बाबा, म्हणजे काय?"
वृद्धाने सांगायला सुरुवात केली, "एक माणूस स्वतःला खूप मोठा खवय्या समजायचा. तो जिथे जाईल तिथे, 'मला काजूशिवाय दुसरं काही चालतच नाही' असा आव आणायचा. एकदा तो एका अंधाऱ्या पंगतीत जेवायला बसला. ताटात सुक्या मेव्याऐवजी चुकून हरभऱ्याच्या टणक चुणचुण्या (भाजलेले कडक दाणे) वाढल्या गेल्या. अंधार असल्याने आणि नाव 'काजू' ऐकल्याने, तो कडक चुणचुण्याच दातात पकडून चावत राहिला. दात दुखायला लागले, तरी लोकांना दाखवण्यासाठी 'वा! काय मटका काजू आहेत!' असं म्हणून फुशारकी मारत राहिला. त्याला 'काजू'ची खरी चव आणि ओळख कधी होतीच नाही, त्याला फक्त त्या नावाचा बडेजाव मिरवायचा होता!"
वृद्ध शेतकरी पुढे म्हणाले, "आज आपल्या समाजातही हेच चाललंय. कित्येक लोक तोंडाने भल्यामोठ्या बाता मारतात, तावातावाने वाद घालतात, पण मूळ विषयाची, सत्याची किंवा ज्ञानाची त्यांना तिळमात्र माहिती नसते. जसे त्या काकांना आपण काय खातोय हे माहीत नाही, पण 'मटण' या शब्दाचा गवगवा करायचा आहे; अगदी तसेच, अनेक लोकं काजू खातोय असं समजून चुणचुण्या चघळण्यातच खोटा आनंद मानत आहेत!"

बोध:
कोणत्याही गोष्टीचा केवळ आंधळा गवगवा किंवा फुशारकी मारण्यापेक्षा, आपण काय बोलतोय, काय करतोय आणि कशाचे समर्थन करतोय याचे खरे भान आणि ज्ञान असणे जास्त महत्त्वाचे असते. अर्धवट ज्ञान हे नेहमीच हस्यास्पद ठरते.

बोधकथा पार्ट १

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा