अनुसूचीत जाती उपवर्गीकरणाविरोधात १० सप्टेंबरला फलटणमध्ये विराट 'संविधान समर्थन मोर्चा'

फलटण:
महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जाती (S.C.) प्रवर्गाच्या आरक्षणात 'अ, ब, क, ड' असे उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली सुरू असून, या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी येत्या गुरुवार, दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी फलटण येथे 'उपवर्गीकरण विरोधी संविधान समर्थन मोर्चा' चे आयोजन करण्यात आले आहे.
आरक्षणातील या उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातीतील सर्व ५९ घटकांना आणि विशेषतः आगामी पिढीला मोठा फटका बसणार आहे. १३ टक्के आरक्षणाचे तुकडे झाल्यास शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गुणवंतांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल, अशी भीती समाजातील विविध घटकांकडून व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनात विविध समाजप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये बौद्ध, चर्मकार, हिंदू खाटीक, बुरुड, हिंदू ढोर, होलार, वाल्मिकी, मेहतर आणि रुखी समाजासह विविध घटक जातींच्या प्रमुखांनी उपवर्गीकरणाविरोधात एकमुखाने आवाज उठवला असून मोर्चात पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मोर्चाचे नियोजन खालीलप्रमाणे:
दिनांक: गुरुवार, १० सप्टेंबर २०२६
वेळ: सकाळी १०:३० वाजता
मार्ग: समाज मंदिर (मंगळवार पेठ) ते बारामती चौक मार्गे प्रांत कार्यालय, फलटण
आयोजक: संविधान समर्थन मोर्चा समिती, फलटण
आपल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि समाजात जनजागृती घडवून आणण्यासाठी या विराट मोर्चात अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व ५९ घटक जातींमधील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने आणि वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संविधान समर्थन मोर्चा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरक्षणातील उपवर्गीकरण रोखण्याची जोरदार मागणी या मोर्चाद्वारे केली जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा