मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या 'सातारा जिल्हा बंद' आणि 'चक्का जाम'; फलटण तालुक्यातील साखरवाडी दुपारी १ वाजेपर्यंत कडकडीत बंद
फलटण/साखरवाडी:
- प्रतिनिधी, नितीन जगताप.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणातील मागण्या राज्य शासनाने मान्य न केल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण सातारा जिल्हा बंद आणि 'चक्का जाम' आंदोलनाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे दुपारी १ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा
मराठा क्रांती मोर्चा, फलटण तालुक्यातील साखरवाडी परिसरात फलक लावून स्थानिक बंदची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. "एक मराठा लाख मराठा" आणि "संघर्षयोद्धा जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनात साखरवाडी दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहील" असा स्पष्ट संदेश या फलकाद्वारे देण्यात आला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत साखरवाडीतील सर्व व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार आणि वाहनधारकांनी एकत्र येत आपापली दुकाने व प्रतिष्ठाने दुपारी १ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेणार आहे.
शांततेच्या मार्गाने महामार्गांवर 'चक्का जाम'
सकल मराठा समाजाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सोमवारच्या आंदोलनादरम्यान सातारा जिल्ह्यातील सर्व मुख्य बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्यात येणार आहेत. यासोबतच जिल्ह्यातील सर्व प्रमुख रस्ते आणि महामार्गांवर शांततेच्या आणि पूर्णपणे शिस्तीच्या मार्गाने 'चक्का जाम' (रस्ता रोको) आंदोलन केले जाईल. "हा लढा आपल्या हक्काचा आणि भावी पिढीच्या भविष्याचा आहे," अशी ठाम भूमिका सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
रुग्णालये, मेडिकलसह अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
आंदोलनादरम्यान सर्वसामान्य नागरिकांची, रुग्णांची अथवा लहान मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून सकल मराठा समाजाने आंदोलनातून काही महत्त्वाच्या सेवा वगळल्या आहेत. त्यानुसार खालील अत्यावश्यक सेवा पूर्णपणे सुरू राहतील:
* सर्व रुग्णालये व रुग्णवाहिका सेवा
* मेडिकल स्टोअर्स (औषध दुकाने)
* दूध विक्री केंद्रे अत्यावश्यक सेवा सुरू राहतील
Comments
Post a Comment