आरक्षणातील फुटीविरोधात फलटणमध्ये ५८ जातींचा महामोर्चा धडकणार
फलटण:
अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील उपवर्गीकरणाबाबत आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सामाजिक ऐक्याला तडा जाण्याची आणि आरक्षणाचे अस्तित्व धोक्यात येण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. या अन्यायकारक निकालाचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरक्षणातील फूट रोखण्यासाठी फलटण शहरात SC प्रवर्गातील ५८ जातींच्या वतीने भव्य 'महामोर्चा' आयोजित करण्यात येणार आहे.
आरक्षणाचे वर्गीकरण झाल्यास अनुसूचित जाती प्रवर्गाची मोठी हानी होणार असून, हा निर्णय भविष्यात समाजाला पुन्हा पारतंत्र्याकडे घेऊन जाणारा ठरू शकतो, असा थेट इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. SC प्रवर्गासाठी असणारे आरक्षण हे संपूर्ण समाजाला एकत्र बांधून ठेवणारा मुख्य धागा आहे. त्यात फूट पाडून समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींचा या मोर्चाच्या माध्यमातून जाहीर निषेध केला जाणार आहे.
या ऐतिहासिक महामोर्चाची रूपरेषा, निश्चित तारीख आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व घटकांची संयुक्त बैठक पार पडणार आहे.
समाजसेवकांना सहभागाचे आवाहन
या लढ्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी SC प्रवर्गातील ५८ समाजांमधील सर्व प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवकांनी एकत्र येऊन संपर्क साधावा, तसेच तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी ‘चलो फलटण’चा नारा देत या महामोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे फलटण येथील समाजबांधव व प्रतिनिधींच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment