फलटण शहर व ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष; जीवघेणा मांजा रोखणार की नागरिकांचे बळी घेणार?

नवनियुक्त DYSP साहेब, बंद गाडीत बसण्यापेक्षा दुचाकीवरून फिरा; रस्त्यांवर मांजाचा मृत्यूचा फास!

फलटण (विशेष प्रतिनिधी):
फलटण शहर आणि ग्रामीण भागात सध्या पतंगबाजीच्या नावाखाली सर्रासपणे बंदी असलेला नायलॉन आणि प्राणघातक मांजा वापरला जात असल्याचे चित्र दिसत आहे. या जीवघेण्या मांजामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे गळे कापले जाण्याचा, निष्पाप नागरिकांचा जीव जाण्याचा आणि मुक्या पक्षांचा बळी जाण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. एवढे सगळे उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही फलटण शहर व ग्रामीण पोलीस प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसून येत आहे. "पोलीस मांजा बंद करणार की एखाद्याचा नाहक बळी गेल्यावर जागे होणार?" असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

DYSP साहेब, गाडीतून बाहेर पडा!

नुकतेच पदभार स्वीकारलेल्या नवनियुक्त पोलीस उपअधीक्षकांनी (DYSP) परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी केवळ चारचाकी गाडीतून फिरणे सोडून द्यावे, अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. एसी गाडीच्या बंद काचांमधून रस्त्यावरील नायलॉन मांजाचे प्राणघातक जाळे आणि नागरिकांची सुरक्षितता दिसू शकत नाही.
 "नवनियुक्त DYSP साहेब, गाडीत बसून फिरण्यापेक्षा कधीतरी दुचाकीवरून किंवा प्रत्यक्ष रस्त्यांवर उतरून शहरात आणि ग्रामीण भागात चक्कर मारा... मग कळेल रस्त्यावर आणि आकाशात मांजाचे किती मोठे संकट घिरट्या घालत आहे!"

दुकानदारांचे धाडस आणि प्रशासकीय निष्काळजीपणा
शासनाने आणि न्यायालयाने नायलॉन मांजावर पूर्णपणे बंदी घातली असली, तरी फलटण शहर व परिसरात छुप्या मार्गाने या मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. पोलीस ठाण्याच्या नाकाखाली हा जीवघेणा व्यापार चालतोच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
दुचाकीस्वारांवर मृत्यूची टांगती तलवार: गल्लीबोळात आणि मुख्य रस्त्यांवर लटकणारे मांजाचे धागे दुचाकीस्वारांच्या गळ्यात अडकून गंभीर अपघात घडलेले आहे तर पुढे घडत जाणार आहेत.
   झाडांवर आणि विजेच्या तारांवर अडकलेल्या मांजात अडकून शेकडो पक्षी तडफडून मरत आहेत.

फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस प्रशासनाने तात्काळ पथके तयार करून अवैध मांजा विक्रेत्यांवर छापे टाकावेत. नायलॉन मांजा विकणाऱ्या आणि वापरणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. नवनियुक्त DYSP यांनी या गंभीर विषयाची दखल घेऊन स्वतः मैदानावर उतरावे मटका जुगार अवैध दारू बंद होईल का यावर शंका आहेच पण जीवघेणा मांजा हद्दपार करावा, अशी ठाम मागणी होत आहे. अन्यथा, नागरिकांच्या जिवाशी होणारा हा खेळ थांबवण्यासाठी प्रशासनाविरोधात तीव्र आवाज उठवला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.




Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा