साखरवाडीत रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार; परवाना निलंबित करण्याची मागणी, तक्रार न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

फलटण (प्रतिनिधी):
साखरवाडी (ता. फलटण) येथील शासकीय रास्त भाव धान्य दुकानदार अशोक ढेंबरे यांच्या गैरकारभाराविरुद्ध आणि ग्राहकांना दिलेल्या मानसिक त्रासाबाबत तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्रकार नितीन बाळासो जगताप यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी व रेशनधारकांनी फलटणचे अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साखरवाडी येथील रेशन दुकानात धान्य आणण्यासाठी गेलेल्या एका वृद्ध महिलेचा बायोमॅट्रिक (Biometric) ठसा न उमटल्यामुळे "तुमचे रेशन कायमचे बंद करीन" अशी धमकी दुकानदार अशोक ढेंबरे यांनी दिली. तसेच त्यांनी अरेरावीची भाषा वापरून नागरिकांना मानसिक त्रास दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तक्रार अर्जात रेशन दुकानदाराच्या गंभीर त्रुटी व नियमांचे उल्लंघन उघड करण्यात आले आहे:
पावती न देणे: धान्य दिल्यानंतर संगणकीकृत पावती (Receipt) देणे बंधनकारक असतानाही ग्राहकांना पावती दिली जात नाही, ज्यामुळे शासकीय धान्य साठ्यात मोठा गैरव्यवहार होत असल्याचा दाट संशय आहे.
 दुकानावर धान्याचे दर, उपलब्ध साठा आणि तक्रार निवारण अधिकाऱ्यांचे नाव असा कोणताही माहिती फलक लावलेला नाही.
दुकान शासकीय नियमानुसार न उघडता दुकानदार स्वतःच्या मर्जीनुसार चालवत असल्याने लांबून येणाऱ्या ग्राहकांची मोठी हाल होते.

रेशन दुकानदार अशोक ढेंबरे यांच्या संपूर्ण कारभाराची व धान्य वाटपाची तात्काळ सखोल चौकशी व्हावी.
बायोमॅट्रिक ठसा न उमटणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी पर्यायी व्यवस्थेद्वारे धान्य देण्यात यावे.
प्रत्येक ग्राहकाला संगणकीकृत पावती देणे सक्तीचे करण्यात यावे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदाराचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात यावा.
या सर्व बाबींवर प्रशासनाने त्वरित गांभीर्याने कारवाई न केल्यास साखरवाडीतील सर्व ग्रामस्थ व रेशनधारक प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा पत्रकार नितीन जगताप आणि ग्रामस्थांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा