कृषी बंधारे दुरुस्त करा, तलावातील अनधिकृत मोटारींवर कारवाई करा! निवासी नायब तहसीलदारांना निवेदन; कारवाईचे आश्वासन

फलटण (प्रतिनिधी):
तरडफ (ता. फलटण) गावातील कृषी बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, तसेच तलावातून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या मोटारी त्वरित बंद करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, या मुख्य मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांना देण्यात आले.
सध्या शेतीसाठी पाण्याचा वापर वाढला असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील कृषी बंधारे सुस्थितीत असणे अत्यंत गरजेचे आहे. बंधारे दुरुस्त झाल्यास पाणीसाठा टिकून राहण्यास मदत होईल, त्यामुळे या बंधाऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच गावातील स्थानिक तलावातून काही व्यक्ती नियमबाह्य आणि अनधिकृतपणे थेट मोटारी लावून पाण्याचा मोठा उपसा करत आहेत. या अनधिकृत पाणी उपशामुळे तलावातील पाणीसाठा झपाट्याने खाली जात असून, त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिक आणि इतर शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे अशा अनधिकृत मोटारी तात्काळ जप्त करून संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

निवेदन स्वीकारल्यानंतर निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी, "संबंधित विभागामार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि शासन नियमांनुसार त्वरित योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल," असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
निवेदन देतेवेळी मौर्य क्रांती महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष कालिदास चोरमले, राष्ट्रीय मानवाधिकार महिला व बाल संरक्षण परिषदेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सुळ यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा