सरडे येथील चव्हाण वस्ती रस्त्याच्या टेंडरमध्ये ग्रामसेवकाचा गोलमाल? ग्रामपंचायतीच्या सदस्यांना डावलून छुप्या पद्धतीने 'टेंडर' काढल्याने संतापाची लाट!
माहिती लपवण्यासाठी नावापुरतीच पेपर प्रसिद्धी; ठेकेदार आणि ग्रामसेवकाची मिलीभगत असल्याचा संशय..?
सरडे (वार्ताहर):
मौजे सरडे येथील चव्हाण वस्ती येथे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामावरून सध्या ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामसेवक चांगलेच अडचणीत येतील काय अशा चर्चा सुरू आहेत. काम करण्यास कोणाची अडचण नाही पण मलिदा खाण्यासाठी ग्रामसेवक यांनी छुप्या पद्धतीने पेपर मध्ये नोटीस दिली आहे का असे नागरिक बोलत आहे.
गावातील काम करण्यास आमची कोणाची अडचण नाही पण ठेकेदार आणि ग्रामसेवक सह राजकीय जवळीक नेते मिळून काम करत असेल तर नक्की नागरिकांची अडचण असल्याचे काही बोलत आहेत.
या रस्त्याच्या कामाचे टेंडर (निविदा) काढताना स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांना पूर्णपणे अंधारात ठेवून, गावाला कोणतीही कल्पना न देता छुपी टेंडर प्रक्रिया राबवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ग्रामसेवकाच्या या हुकूमशाही कारभाराविरुद्ध आणि गावाला अंधारात ठेवण्याच्या वृत्तीविरुद्ध ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, "ग्रामसेवकांनी गावाला नाचवण्याचे काम करू नये," असा संतप्त इशारा आता दिला जात आहे.
चव्हाण वस्ती येथील रस्ता खडीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, ही टेंडर नोटीस नेमकी कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली, हे अद्याप गावातील कोणालाही माहिती नाही. केवळ शासकीय सोपस्कार पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी नाव नसलेल्या किंवा अत्यंत कमी खपाच्या अंकात ही जाहिरात प्रसिद्ध केल्याचा संशय आहे. गावातील लोकांना आणि लोकप्रतिनिधींना याची माहिती मिळू नये, हाच यामागील मुख्य हेतू असल्याचा आरोप होत आहे. या छुप्या टेंडर प्रक्रियेत ग्रामसेवक आणि ठेकेदाराची मोठी मिलीभगत असल्याचे उघडपणे बोलले जात आहे.
परवानगी कोणाची घेतली? टेंडर नोटीस काढताना ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीची किंवा सदस्यांची मंजुरी घेतली होती का?
जाहिरातीचा खर्च कुठून केला? या पेपर प्रसिद्धीसाठी लागणारा निधी कोठून आणि कोणत्या अधिकारात खर्च करण्यात आला?
माहिती का लपवली? जाहिरात कोणत्या वृत्तपत्रात दिली, हे गावाला का सांगितले गेले नाही? यामागे नक्की कोणाचा छुपा वरदहस्त आहे?
या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून सदर टेंडर जाहिरात तात्काळ रद्द करण्यात यावी आणि नियमांनुसार पुन्हा पारदर्शक पद्धतीने प्रसिद्धी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.
सरडे येथील या भोंगळ कारभाराची आणि संशयास्पद टेंडर प्रक्रियेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून संबंधित वादग्रस्त ग्रामसेवकाची तात्काळ बदली करण्यात यावी. अन्यथा, येत्या १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिनी) रोजी फलटण पंचायत समिती समोर 'नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस' (NDMJ) संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी दिला आहे
Comments
Post a Comment