पिंप्रदमध्ये शासकीय जागेत अनधिकृत शेडचे बांधकाम.? ग्रामसेवक डांगाने यांच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांमध्ये संशयाचे वातावरण; कारवाई न झाल्यास बदलीची मागणी..?
पिंप्रद (प्रतिनिधी):
पिंप्रद गावच्या हद्दीत शासकीय जागेत अनधिकृतपणे शेड उभारण्याचे काम जोरात सुरू असून, या सर्व प्रकारात ग्रामपंचायत अधिकारी आणि संबंधित अतिक्रमणधारकांची काही हातमिळवणी अथवा भागीदारी आहे की काय ? अशी जोरदार चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. उघडपणे अनधिकृत शेडचे काम चालले असतानाही ग्रामसेवक सुस्त असल्याचे पाहायला मिळत असून, प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील शासकीय जागेवर कोणतेही कायदेशीर नियम पाळता उघडपणे अतिक्रमण करून शेड उभारली जात आहे. या प्रकाराची दखल घेत गावातील सजग ग्रामस्थांनी संबंधित कामाबाबत विचारणा करण्यासाठी आणि तक्रार नोंदवण्यासाठी ग्रामसेवक श्री. डांगाने यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा तसेच भ्रमणध्वनीवर (फोन) संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, ग्रामसेवक डांगाने यांच्याकडून या विषयावर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
ग्रामसेवकाच्या या मनमानी आणि संशयास्पद कारभाराबाबत बोलताना काही ग्रामस्थांनी सांगितले की, ग्रामसेवकाचा गावात मोठा दरारा असून सामान्य नागरिकांच्या तक्रारींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. अनधिकृत कामावर कारवाई करण्याऐवजी संबंधित अतिक्रमणधारकांना पाठीशी घालण्याचाच प्रकार ग्रामपंचायतीकडून सुरू असल्याचा आरोप लोक करत आहेत. सध्या पिंप्रद ग्रामपंचायतीच्या कारभाराची अवस्था ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशीच झाली आहे.
कारवाई करा, अन्यथा बदली करा!
सरकारी जमिनीवर होणारे हे उघड अतिक्रमण तातडीने हटवून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी पिंप्रद येथील ग्रामस्थांनी केली आहे. जर ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित अधिकारी या अतिक्रमणावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असतील, तर अशा संशयास्पद भूमिकेत असणाऱ्या ग्रामसेवकाची गावातून तात्काळ बदली करण्यात यावी, असा इशाराही संतप्त ग्रामस्थ देणार असल्याच्या चर्चा आहे. आता या प्रकरणावर वरिष्ठ अधिकारी काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment