सरडे गावात राजकीय भूकंप! तिसरी आघाडी झाल्यास दिग्गज ज्येष्ठ नेत्याच्या घरातील तरुण स्वतःच्या खर्चाने निवडणूक लढवणार
फलटण (प्रतिनिधी):
सरडे गावामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'तिसरी आघाडी' निर्माण होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. या चर्चांनी गावातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, आता एका मोठ्या राजकीय घराण्यातील युवा कार्यकर्त्याने थेट बंडाचे निशाण फडकावले आहे. गावातील एका प्रतिष्ठित आणि सर्वसामान्य जनतेशी जवळीक असणाऱ्या दिग्गज ज्येष्ठ नेत्याच्या घरातील तरुणाने, "गावात तिसरी आघाडी झाली, तर मी स्वतः स्वखर्चातून निवडणूक लढवणार," अशी रोखठोक घोषणा केल्यामुळे सरडे गावातील प्रस्थापित राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत.
घरातील नेत्यांवर थेट प्रहार: "त्यांनी स्वतःचा फायदा केला, जनतेचा नाही"
सोशल मीडियावरील तिसऱ्या आघाडीच्या वृत्तानंतर या युवा कार्यकर्त्याने आपली भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडली. आपल्याच घरातील ज्येष्ठ नेत्यांवर थेट निशाणा साधत तो म्हणाला, "आमच्या घरातील नेते मोठे असले, तरी त्यांनी आजवर फक्त स्वतःच्या घराचा फायदा केला आहे, जनतेचा कधीही विकास केला नाही. मी त्यांच्याच आडनावाचा आहे म्हणून मी त्यांच्या चुकीच्या धोरणांना पाठिंबा देणार नाही. मला माझ्या गावचा निःस्वार्थ विकास करायचा आहे."
'घरात नको, जनतेच्या घरात विकास करायचाय'
या तरुणाने आपल्या स्पष्टवक्त्या स्वभावाने संपूर्ण गावाची लक्ष वेधून घेतले आहे. प्रस्थापित घराणेशाहीला आव्हान देत त्याने सांगितले की, त्याला विकासाची गंगा फक्त नेत्यांच्या घरात नव्हे, तर सरडे गावातील प्रत्येक सामान्य जनतेच्या दारापर्यंत आणि घरात पोहोचवायची आहे. कोणत्याही ज्येष्ठ नेत्याच्या पाठिंब्याची किंवा मदतीची गरज नसून, गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि परिवर्तनासाठी आपण स्वतःच्या हिंमतीवर आणि स्वखर्चाने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार असल्याचे त्याने ठामपणे सांगितले.
ज्येष्ठ नेत्यांच्या घरातील तरुणांचा तिसऱ्या आघाडीला पाठिंबा!
या धक्कादायक विधानामुळे सरडे गावातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. गावातील दिग्गज ज्येष्ठ नेत्यांच्या घरातीलच सुशिक्षित आणि समतोल विचारांचे तरुण आता या तिसऱ्या आघाडीच्या बाजूने उभे राहण्याचा निर्धार करत आहेत. घराणेशाही आणि आश्वासनांना कंटाळलेला हा युवावर्ग आता गावात नवीन पर्याय उभा करण्यासाठी सज्ज झाला असून, या तरुण कार्यकर्त्याच्या भूमिकेमुळे सरडे गावातील दिग्गजांना मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता ही तिसरी आघाडी प्रत्यक्षात कशी आकाराला येते आणि गावातील प्रस्थापित नेते या अंतर्गत बंडाला कसे तोंड देतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment