फलटण वकील संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा ग्रंथ भेट देऊन सन्मान; 'ॲड. बापुसाहेब शिलवंत अँड असोसिएट्स'कडून शुभेच्छा
फलटण, प्रतिनिधी :
फलटण वकील संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा 'ॲड. बापुसाहेब शिलवंत अँड असोसिएट्स' यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना यशस्वी, लोकाभिमुख आणि न्यायनिष्ठ कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
फलटण वकील संघाचे नवनियुक्त अध्यक्ष ॲड. उमेश कदम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "जनता" हा ग्रंथ भेट देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच उपाध्यक्ष ॲड. मेघा अहिवळे, सचिव ॲड. अनिरुद्ध सस्ते, सहसचिव ॲड. शारदा दीक्षित, खजिनदार ॲड. शाम अहिवळे, सदस्य ॲड. चैत्राली शिंदे आणि सदस्य ॲड. रोहिणी भंडलकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे "जाती निर्मूलन (Annihilation of Caste)" हे विचारप्रवर्तक पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, न्याय, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा वारसा समाजात अधिक दृढ व्हावा, तसेच वकिली व्यवसायात सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने हे ग्रंथ भेट देण्यात आल्याचे ॲड. बापुसाहेब शिलवंत यांनी सांगितले.
यावेळी ॲड. बापुसाहेब शिलवंत म्हणाले, "नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली फलटण वकील संघाची उत्तरोत्तर प्रगती होवो. वकील बांधवांच्या हितासाठी, न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी ही कार्यकारिणी उल्लेखनीय कार्य करेल, असा विश्वास आहे."
या सन्मानामुळे वकील संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment