राजाळे येथील 'अक्षय ज्वेलर्स' कडून सर्वसामान्यांची करोडोंची फसवणूक; तक्रारीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष....?
हक्काचे सोने अडकल्याने नागरिक हवालदिल; पोलीस आणि सोनारामध्ये 'हितसंबंध' असल्याचा जनतेचा संशय!
फलटण येथील 'दक्षता समिती' कडे धाव; पीडितांना आता फक्त दक्षता समितीकडूनच न्यायाची अपेक्षा
फलटण/राजाळे:
सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांनी आपल्या हक्काचे आणि कष्टाचे सोन्या-चांदीचे दागिने अडीअडचणीला मदत व्हावी म्हणून राजाळे येथील प्रसिद्ध 'अक्षय ज्वेलर्स' मध्ये गहाण ठेवले होते. मात्र, संबंधित दुकानदाराने शेकडो नागरिकांची फसवणूक करून दुकान बंद पोबारा केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या लुटीमुळे राजाळे व परिसरातील शेकडो कुटुंब रस्त्यावर आली असून, या महाठगावर कारवाई करण्यासाठी नागरिक पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु, पोलीस प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने, "पोलीस आणि लुटणाऱ्या सोनारामध्ये नक्की काय हितसंबंध आहेत?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सरडे येथील मूळ रहिवासी असलेल्या व्यक्तीचे राजाळे (ता. फलटण) येथे 'अक्षय ज्वेलर्स' नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे आणि होते. ग्रामीण भागातील निष्पाप आणि गरजू नागरिकांनी घरगुती अडचणी, लग्नकार्य आणि शेतीकामासाठी आपल्या घरातील सोन्याचे दागिने या दुकानात गहाण ठेवले होते. दुकानदाराने नागरिकांना दुकानाच्या नावाच्या अधिकृत पावत्याही दिल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे दुकान अचानक पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. दुकानदार गायब झाल्याचे समजताच नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली. दुकानाच्या पावत्या हातात घेऊन आपले हक्काचे सोने परत मिळवण्यासाठी नागरिक आता वणवण भटकत आहेत.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्रस्त नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, नेहमीप्रमाणे येथेही सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच पडली. संबंधित पोलीस अधिकारी या मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास टाळाटाळ करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनतेची लूट झाली असतानाही पोलीस ढिम्म का? गुन्हेगाराला पोलिसांचे मूक संरक्षण आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलीस आणि अक्षय ज्वेलर्सच्या मालकामध्ये पडद्याआडून काहीतरी वेगळेच शिजत असल्याचा संशय आता बळावला आहे.
पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळण्याची आशा मावळल्याने अखेर पीडित नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अनुसूचित जाती-जमाती उपविभागीय दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन लेखी अर्ज सादर केले आहेत. या लुटीमध्ये मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यामुळे हा विषय लवकरच फलटण येथील दक्षता समितीच्या बैठकीत अत्यंत गांभीर्याने घेतला जाणार असल्याचे समजते.
"पोलीस विभागाकडून आम्हाला न्याय मिळणार नाही, हे त्यांच्या ढिसाळ कारभारावरून स्पष्ट झाले आहे. आता केवळ अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक दक्षता समितीच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते, असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे."
सातारा सम्राट' वृत्तपत्राचा इशारा ( संपादकीय मत):
गोरगरिबांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या 'अक्षय ज्वेलर्स'च्या मालकावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात यावी, अन्यथा या अन्यायाविरुद्ध आणि पोलीस प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांमधून दिला जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून पोलीस प्रशासनाने आपली प्रतिमा सुधारावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.
पार्ट..1
अक्षय ज्वेलर्स माध्यमातून किती लोकांना फसवले
Comments
Post a Comment