केमिकल मिश्रित विषारी दारूमुळे राजाळेत तरुणांचा जातोय बळी..?कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा इशारा!

(प्रशासकीय अनास्थेमुळे राजाळे गावात बेकायदा धंद्यांचे पेव )

 ग्रामपंचायतीचा फलटण पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला थेट इशारा

फलटण : फलटण तालुक्यातील जनाई देवी तीर्थक्षेत्र असलेल्या राजाळे गावात केमिकल मिश्रित हातभट्टीची बेकायदा दारू विक्री, मटका, गुटखा, जुगार आणि गांजा यांसारख्या अवैध धंद्यांनी भयानक रूप धारण केले आहे. या विषारी दारूमुळे गावातील तरुण पिढी पूर्णपणे व्यसनाधीन झाली असून, दर पंधरा दिवसाला कोणत्या ना कोणत्या तरुणाचा या विषारी दारूमुळे किंवा दारू पिऊन प्राशन केल्यामुळे मृत्यू होण्याचे चित्र होणार की काय असे धक्कादायक नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. या गंभीर परिस्थितीबाबत राजाळे ग्रामपंचायतीने पोलीस प्रशासन आणि दारूबंदी विभागाकडे तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

 जुन्या तक्रारींवर ठोस कारवाई शून्य!

राजाळे ग्रामपंचायतीने आणि ग्रामस्थांनी यापूर्वी २०२१ पासून अनेकदा लेखी तक्रारी दिल्या आहेत. यामध्ये गावठी दारू विक्रेत्यांची नावे देखील पोलीस प्रशासनाला पुरवण्यात आली होती. मात्र, पोलीस अथवा दारूबंदी (राज्य उत्पादन शुल्क) विभागाने कोणतीही ठोस दंडात्मक किंवा संयुक्त कारवाई केली नाही. प्रशासनाच्या या ढिसाळ आणि दुर्लक्षित कारभारामुळेच गावातील या अवैध धंद्यांची व्याप्ती अधिक वाढली असल्याचा थेट आरोप पत्रात करण्यात आला आहे.
 गाड्यांमधून दारू आणि अमली पदार्थांचा पुरवठा
सध्या राजाळे गावामध्ये बाहेरून बेकायदा दारू घेऊन रोज गाडी येत असते. तसेच गावात गुटखा आणि गांजाचा सप्लाय गाडीतून केला जात आहे. गावातील बीट अधिकारी व संबंधित पोलिसांना वारंवार तोंडी व लेखी सांगूनही ही दारू वाटपाची साखळी अद्याप तुटलेली नाही. संपूर्ण गावात सीसीटीव्ही सर्व्हेलन्स असून, याचे फुटेज देखील प्रशासनाला देण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शवली आहे.

ग्रामपंचायतीने आणि ग्राम दक्षता समितीने पोलीस प्रशासनाला जाब विचारत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत:
 * गावातील अवैध गुन्हेगारांवर आतापर्यंत कोणावर किती गुन्हे दाखल केले?
 * त्यातील किती गुन्हे सिद्ध झाले?
 * उल्लंघन करणाऱ्यांवर काय कारवाई झाली?

याबाबतची कोणतीही माहिती प्रशासनाकडून ग्रामपंचायतीला किंवा दक्षता समितीला दिली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
 
 श्री जानाई देवीचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या पवित्र गावात चालणारे हे अवैध धंदे शंभर टक्के बंद करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासक व उपप्रशासक यांनी पत्राद्वारे केली आहे. जर प्रशासनाने यावर तात्काळ प्रतिबंधात्मक पावले उचलली नाहीत, तर समस्त राजाळे ग्रामस्थांच्या वतीने पोलीस स्टेशन अथवा तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या पत्राच्या प्रती आमदार सचिनजी पाटील (फलटण-कोरेगाव विधानसभा), सातारा पोलीस अधीक्षक, अधीक्षक दारूबंदी विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि फलटणचे तहसीलदार यांना पाठवून तात्काळ एकात्मिक कारवाईचे नियोजन करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Comments