साखरवाडीत दोन घरे फोडली; पोलीस चौकीत शुकशुकाट असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप
फलटण तालुक्यातील साखरवाडी गावामध्ये काल मध्यरात्री अज्ञात चोरांनी दोन बंद घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चोरीची माहिती देण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी ग्रामस्थ स्थानिक साखरवाडी पोलीस चौकीत गेले असता, तिथे एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. पोलीस प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रात्रीच्या गस्तीचा अभाव; चोरट्यांचे फावले
मिळालेल्या माहितीनुसार, चोरांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत साखरवाडीतील दोन घरे लक्ष्य केली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील मौल्यवान वस्तू लंपास केल्या. साखरवाडी ही मोठी बाजारपेठ आणि केंद्रवर्ती ठिकाण असतानाही येथे रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त (Petrolling) होत नसल्याने चोरांचे धाडस वाढले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पोलीस चौकी रामभरोसे; २४ तास नेमणुकीची मागणी
चोरीची घटना घडल्यानंतर भयभीत झालेले नागरिक तातडीने साखरवाडी पोलीस चौकीत धाव घेतली. मात्र, चौकीला कुलूप असल्यासारखी परिस्थिती असून तिथे कोणीही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. "एवढी मोठी घटना घडूनही जर पोलीस चौकीत कोणी नसेल, तर नागरिकांनी सुरक्षेसाठी कोणाकडे पाहायचे?" असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
साखरवाडी आणि परिसरातील वाढती गुन्हेगारी पाहता, जिल्हा पोलीस प्रमुखांनी या घटनेची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. साखरवाडी पोलीस चौकीत दिवसा आणि रात्रीच्या वेळेस कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी आणि परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी आग्रही मागणी साखरवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.
Comments
Post a Comment