भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाविरोधात खामगांवच्या तरुणांचा संताप; ४ जूनला फलटणमध्ये ठिय्या आंदोलन!
फलटण तालुक्यातील खामगांव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या निधीचा अपहार, आर्थिक गैरव्यवहार आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचे शासकीय चौकशीत सिद्ध होऊनही अद्याप दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्याने खामगांव येथील युवक आणि ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले आहेत. प्रशासनाच्या या दिरंगाईचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि दोषींना तात्काळ गजाआड करण्यासाठी आगामी ४ जून २०२६ रोजी फलटण पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनासाठी फलटण शहर पोलीस स्टेशनने रीतसर कायदेशीर परवानगी करिता अर्ज दिला असून पोलिसांकडे तशी नोंद करण्यात आली आहे. खामगांव ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार आणि आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची लेखी तक्रार ॲड. अभिजीत प्रमोद चाबुकस्वार यांनी मार्च २०२५ मध्ये केली होती. या प्रकरणात सुरुवातीला पंचायत समिती अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात टाळाटाळ होत असल्याने, ॲड. अभिजीत प्रमोद चाबुकस्वार मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायदेशीर निर्देश मागितले होते. मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर चौकशीला गती आली व त्यानंतर पंचायत समिती फलटण यांनी तत्काळ ॲड. अभिजीत प्रमोद चाबुकस्वार यांच्या तक्रारी वर चौकशीची सुनावणी घेत सुमारे ६०० पानांचा अहवाल जिल्हा परिषद सातारा यांचेकडे दिनांक ३१/१२/२०२५ पुढील कारवाई साठी सादर केला आहे. परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. मा. गटविकास अधिकारी (BDO) पंचायत समिती फलटण यांनी या प्रकरणात विस्तार अधिकारी बी.बी. भोसले यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून सखोल चौकशी केली आणि दिनांक ३१/१२/२०२५ रोजी मा. गट विकास अधिकारी ( BDO) यांनीआपला अधिकृत चौकशी अहवाल जिल्हा परिषद सातारा यांचेकडे सादर केला आहे. या अहवालात ग्रामपंचायतीमध्ये निधीचा अपहार आणि बनावट दस्तऐवज तयार करून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्टपणे सिद्ध झालेले असून संबंधित तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी पदाचा गैरवापर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असल्याचे नमूद आहे. परंतु सदर अहवालानुसार अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने तसेच पंचायत समिती प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. चौकशी अहवाल येऊन अनेक महिने उलटले, तरीही संबंधित दोषी व्यक्तींवर कोणतीही फौजदारी कारवाई (FIR) करण्यात आलेली नाही. शासकीय निधी हडप करणाऱ्यांना राजकीय दबावापोटी पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल केले नाहीत, तर संपूर्ण गाव रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे. ४ जून रोजी फलटण पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन प्रशासनाच्या या संथ कारभाराचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे नोंदवण्याच्या मुख्य मागणीसाठी खामगांवचे ग्रामस्थ संविधानिक मार्गाने आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे रीतसर निवेदन पंचायत समिती फलटण , फलटण शहर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले असून या आंदोलनात ॲड. अभिजीत चाबुकस्वार, आशिष बनसोडे, तेजस जावकर, हर्षद भगत, रविकांत गायकवाड, युवराज माने यांच्यासह गावातील युवक, शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तत्काळ कारवाई करून गुन्हे दाखल न केलेस ४ जून रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे तसेच यापुढील काळात तीव्र स्वरूपाचे कायदेशीर पाऊल उचलले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
Comments
Post a Comment